काही दिवसांपूर्वी मी एक पोस्ट टाकली होती. त्यात मी उल्लेख केला होता तो आमच्या डुईसबुर्ग जर्मन लँग्वेज कोर्स साठी आम्ही गेली ३ वर्षे जर्मन नाटक सादर करतो त्या गोष्टीचा. गेल्या ३ वर्षांमध्ये आम्ही जे काही सादर केले त्याविषयी मी सविस्तर लिहीन हेही त्यात मी नमूद केले होते. बऱ्याच लोकांनी नक्की लिही, आम्ही वाट बघतोय असे सांगून माझा उत्साह अजूनच वाढवला.
२०१६ सालापासून ते २०१९ पर्यंतच्या आमच्या जर्मन नाटकांचा आढावा घेणारी हि सिरीज.
सुरु करूयात २०१७ पासून…
पण २०१६ सालीच अश्या प्रकारच्या इनिशिएटिव्ह ची मुहूर्तमेढ रोवली गेली होती.
साल २०१६:
डुईसबुर्ग जर्मन लॅंग्वेज कोर्स, वर्ष ८ वे :
दरवर्षीप्रमाणे ह्या कोर्स चा भाग म्हणून, ह्याच कोर्स मधे शिकणारी मुले, त्यांच्या जर्मन भाषेच्या शिक्षकांसमोर आणि होस्ट फॅमिली साठी भारतीय संस्कृती दाखवणारी प्रेझेन्टेशन करतात, जेणेकरून आपल्या संस्कृतीच्या काही खुणा जर्मन लोकांपर्यंत पोहोचतील. २०१६ साली काही लोकांनी असा फीडबॅक दिला कि तुमची प्रेझेन्टेशन आता आमच्यासाठी कंटाळवाणी होतात कारण गेली अनेक वर्षे ह्या स्वरूपाचेच आम्ही काही बाही पाहत आलो आहोत. पुढच्या वर्षीपासून काहीतरी छोटे आणि वेगळे करण्याचा प्रयत्न करा.
साल २०१७:
डुईसबुर्ग जर्मन लॅंग्वेज कोर्स, वर्ष ९ वे :
ह्या कोर्स चाच एक भाग म्हणजे काही ठिकाणांना भेट देणे आणि त्याविषयी सविस्तर जर्मन भाषेत लिहिणे. सर्वांची आवडती जागा म्हणजे लोरलाय बोट राईड. लोरलाय नावाचे एक खूप प्रसिद्ध पण काल्पनिक पात्र आहे. ती ऱ्हाईन नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या खडकांवर नग्नावस्थेत बसते आणि येणाऱ्या जाणाऱ्या खलाश्यांचे आणि कोळ्यांचे चित्त वेधून घेते. जेव्हा खलाशी तिच्या जवळ, तिला जवळून न्याहाळायला जातात तेव्हा मात्र त्यांची बोट बुडते आणि त्यांना जलसमाधी मिळते. तर ह्याच कथेचा आधार घेऊन एका जागी, खडकावर लोरलाय चा पुतळा आहे. दोन्ही बाजूनी डोंगर, मधे नदी, एकूण निसर्गरम्य परिसर, परिकथेत शोभेल असा. सध्या आजूबाजूच्या डोंगरांवर वायनरी पण आहेत. अश्या परिसरामधून हि बोट आपल्याला घेऊन जाते. ह्याच गोष्टीवर एका सुप्रसिद्ध जर्मन कवीची सुप्रसिद्ध कविता पण आहे. त्या कवीचे नाव हायनरीश हायने आणि कवितेचे नाव, दि लोरलाय:
त्या कवितेचा भावानुवाद साधारण असा:
उदास उगीच मी , झाले काय कळेना,
कथा एक जुनी, मनातून जाईना.
थंड साऱ्या दिशा, अन विसावतो सूर्य
चमके शिखर किरणांनी, वाहणे नदीचे कार्य
वेणी फणी खडकावर,करते एक सुकन्या
अशी सोनसाखळी चमके, पिवळ्या दिसती धमन्या
ती अदभुत स्वर हे फेकी, प्रसाधनाच्या वेळी
किती मोहक हा गोडवा, फसे बिचारा कोळी
थांबली क्षणात हि होडी, सुरु झाला कर्दनकाळ
जिथे कन्या हि बसलेली, प्रदेश तो खडकाळ
आपटुन लाटा येति, अन कोळी बिचारा बुडला
कृत्य नसे दगडांचे, हा घात सुरांनी केला!
ह्या कवितेवर आधारित काही छोटेखानी प्रसंग उभे करता येतील का असा एक विचार मनात आला. कोर्स सुरु होण्याआधी मुलांसाठी इकडे एक शिबीर घ्यावे, ज्यात मुलांना जर्मनी ची नीट ओळख करून द्यावी असाही विचार होताच. त्या निमित्ताने हे दोन्ही एकत्र करून एक प्री-डिपार्चर कोर्स करून घेता येईल असं ठरले. मुले एकमेकांना नाटकाच्या तालमींदरम्यान नीट जाणून घेतील आणि मजा करत, हसत खेळत एका संस्कृतीच्या जवळ जातील आणि त्यानिमित्ताने नकळत खूप काही शिकून जातील असाही हेतू त्यानिमित्ताने साध्य झाला.
तर, लोरलाय, ह्या नावाभोवती काय काय नवीन शब्द सुचू शकतात, काय काय असोसिएशन डोक्यात येऊ शकतात अशी चर्चा मुलांबरोबर चालू असताना डोक्यामध्ये एक शब्द आला, फेरलोरलाय. दोन शब्दांचा हा मेळ, फेरलोरेन आणि लोरलाय.
फेरलियरेन हे एक जर्मन भाषेमधील क्रियापद आहे, त्याचा अर्थ हरवणे. त्याचा भूतकाळ होतो, फेरलोरेन आणि लोरलाय. म्हणजेच काहीतरी हरवले आहे, हरवते आहे आणि लोरलाय च्या भोवती ते हरवणे दाखवले तर?
अश्या तऱ्हेने मुलांना काहीतरी लिहायला लावले. त्याचे अर्थ चर्चेतून शोधायला लावले. त्यासाठी आमची मैत्रीण अनुष्का आणि तिची बहीण आश्लेषा ह्यांची मोलाची मदत झाली. अनुष्काने मुलांकडून अनेक थिएटर एक्सरसाईझ करून घेतले. छोटे प्रसंग उभे करायला कायिक अभिनयाची मदत घेतली. आश्लेषा ने काही प्रसंग नीट शब्दबद्ध करायला मदत केली.
आणि हळूहळू ४ ते ५ प्रसंगांचे नाट्य उभे राहिले.
लोक मोबाईल वर बोलताना त्यांचे चित्त हरवून बसतात, एकमेकांशी चॅट करताना स्थळ-काळाचे भान हरवून बसतात, रस्त्यामध्ये कुठे जायचे हेच विसरतात आणि जवळच्यांना हरवून बसतात इत्यादी मजेशीर प्रसंगांची एक माळ तयार झाली. त्यांना एका सूत्रात मुद्दाम बांधणारा सूत्रधार तयार झाला. अत्यंत उद्दाम असा ! आणि हे प्रसंग सादर होत असताना मागे कुठेतरी लोरलाय उभी आहे आणि हरवण्याचे खापर कुठेतरी, नकळतपणे तिच्यावर फोडले जातेय अशी एक गोष्ट आकारास येऊ लागली.
तालमी सुरु होत्या, मुलं एकमेकांना समजून घेत, प्रसंग समजून घेत नाट्य शोधत होती. पण म्हणावा तसा पंच सापडत नव्हता. ह्या सगळ्यात लोरलाय ची भूमिका काय? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. लोरलाय तिच्यावरच्या आरोपांचे खंडन कसे करेल हा प्रश्न ह्या ना त्या प्रकारे आम्ही एक्सप्लोर करत होतो पण ठोस काही गवसेना. लोरलाय चा रोल करणारी भारतीय शास्त्रीय नृत्यात पारंगत होती. ती भूमिकेत रंग भरु शकत होती पण शब्द अपुरे होते…..
एके दिवशी, एज्युनोव्हा मध्ये शिकवणारी आमची एक सहकारी, अदिती आमच्या तालमीला आली होती. तिला आमचा खटाटोप पाहून आणि प्रसंग पाहून एक कविता सुचली. लोरलाय च्या मनात रुंजी घालणारी, अर्थात जर्मन मध्ये. त्याचा भावानुवाद असा:
उदास उगीच मी, झाले काय कळेना
हि कसली असली कथा, व्यथाहि नीट मांडेना
नुसतेच ह्रदय हे, नाही काही आत
विचार येति जाती, हरवून जाई वाट
लोरलाय म्हणते किंबहुना विचारते,
अशी बालपणापासूनी गाते मी एकटी
हे सूर असे जादुई, सौंदर्याची भुकटी
तशी बालपणापासूनी नाचे मी देखणी,
करीत नाही पर्वा, धडपडले पाहून कोणी
धरते सुरेल ठेका अन गाणेच मला उमगते
पावले गळा अन सूर हे ह्रदयी मी ठेवते
पाहून हरपले भान, अन विसरली तहान?
नाही त्याची पर्वा, म्हणून मी सैतान?
आणि त्या क्षणी, आम्हाला आमची लोरलाय मिळाली. शेवटच्या प्रसंगात गिरक्या घेत आणि गाण्यातून प्रश्न विचारत लोरलाय तिची व्यथा मांडते असा प्रसंग लिहिला.
आणि आम्हाला आमचे स्टेटमेंट पण मिळाले,
स्वतःचे काहीतरी हरवल्यानंतर इतरांवर त्याचे खापर फोडणे सोपे असते पण आपण स्वतःच्याच चुकांकडे फार सोयीस्करपणे कानाडोळा करतो, नाही?