डुइसबुर्ग जर्मन लँग्वेज कोर्स, सप्टेंबर २०१८

२०१७ साली, आम्ही पहिल्यांदा कोर्स मधील मुलांना घेऊन जर्मन नाटक बसवले. कोर्स मधल्याच मुलांनी लिहिलेलं. आणि तो प्रयोग खूपच वाखाणला गेला. त्या प्रयोगाविषयी मी लिहिले होते त्याची हि लिंक :

 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10159070306062995&id=720212994

आता वळूयात २०१८ सालाकडे.

भारतीय संस्कृतीचे दर्शन: असं वर्णन असलेलं काही डोळ्यासमोर आणायचे तर परदेशी लोकांसमोर साडी, नमस्ते, योगा ह्या पलीकडे आपण फारसे कधी काही सादर करायला जात नाही. भारतात घडणाऱ्या गोष्टी, आपला सामाजिक आणि राजकीय अवकाश अश्या भानगडीत सहसा फारसे कोणी पडत नाही. कारण, मग असं काही दाखवल्याने भारताची इमेज खराब होईल असं कुठेतरी वाटत असते. बऱ्याच वेळा, वास्तविक, आपल्या अवकाशाचा सजगपणे धांडोळा घेण्याचा आपला प्रयत्नच नसतो. आपले भारतीय विद्यार्थी खरे तर अशी संधी शोधत असतात पण मुळात अश्या संधी निर्माण होण्याची शक्यता; विशेषकरुन कलाप्रकारांमध्ये, अभावानेच जाणवते. आणि जिथे अश्या संधी असतात, तिथे त्यांना कुठल्यातरी एका विशिष्ट विचाराने ग्रासलेले असते. लेबल घेऊन पुढे चाललेली कला, एवढे साधारणपणे त्याचे स्वरूप उरते. थोडक्यात, डावी कला, उजवी कला, कुठल्यातरी हेतूने सादर केली गेलेली कला इत्यादी. त्यामुळे अश्या प्रकारात एक अत्यंत शांत आणि विचार करायला लावणारे चित्र डोळ्यासमोर उभे राहत नाही. त्याला कारणंही तशीच असतात.

अनेक बाजूंनी, अनेक कोपऱ्यातून आपल्यावर आदळणारं काही. काही गोष्टी, काही बातम्या, काही किस्से. आणि हे सगळे एकाचवेळी आपल्याला ऐकू येत असते, दिसत असते; किंबहुना आपल्यावर आदळत असते. ह्या आदळण्यामुळे भान विसरून गेलेले आपण, आपण मुळातच भानावर नाही आहोत हेच विसरून जातो आणि मग चालू होतो एक मूल्यविरहित प्रवास…….

माझ्या डोक्यात असलेले २०१८ सालचे हे विचार…..

ह्यावर नाटक करता येईल का? हा पडलेला प्रश्न आणि मग हे नक्की कुठे पाहायला मिळते ह्याचा लावत गेलेला शोध आणि त्याचाच परिपाक म्हणजे २०१८ साली आम्ही केलेला एक दृकश्राव्य नाट्यप्रयोग. एका नभोवाणी प्रकारात मोडणारे नाटक.

नाटकाचे नाव होतं :

कुहहोमोसेपियंस

(कुह: जर्मन मधे, गाय)

त्या वेळी, भारतात, गोमांस विकल्याच्या संशया वरून लोकांच्या हत्या हा विषय ताजा होता. त्यामुळे डावे, उजवे, मधले, एकमेकांवर , विरूद्ध, कोणाच्यातरी बाजूने, सतत लिहीत होते, बोलत होते. अनेक बाजूंचे मुद्दे माध्यमात येत होते. त्यांचे यथावकाश राजकारण पण चालू होते. प्रत्येकजण आपापल्या परीने, आपापल्या झेंड्यासाठी प्रोपोगांडा रेटत होता. फेसबुकवर विचारवंत रोज नवी माहिती मांडत होते. सगळीकडून एकसारखे काही ना काही ऐकू येत होते. खरी बाजू, खोटी बाजू यापलीकडे सगळे वातावरण होते. काही बाबतीत उजवे योग्य होते, काही मुद्दे डाव्यांचे पण चपखल होते, काही गोष्टी, मधले सुद्धा, योग्य रीतीने लोकांसमोर मांडत होते. गांधीवादी, आंबेडकरवादी, लाल सलाम वाले, संघाचे सगळेच एकाचवेळी एकमेकांवर तुटून पडले होते.

अश्या परिस्थितीत नक्की कुठली मूल्यव्यवस्था निर्माण होत असते किंवा कुठल्या मूल्यांना तिलांजली मिळत असते हे लगेच कळत नाही. त्यासाठी काही एक काळ जावा लागतो. आणि अश्या त्या काळात, आपण सर्व विचार करू शकू, अशी परिस्थिती आपणच निर्माण होऊ देणं आपल्या फायद्याचे असते.

नेमके हेच आपण मांडले तर?

गोहत्या, गोमास विक्रीवरून उडालेला गदारोळ? लोकांची होणारी वैचारिक फरफट?

नेमके आपल्या हाती ह्यातून काय लागले?, ह्यावरच बोलले तर?

आणि मग सुरू झाला ह्या नाटकाचा प्रवास. आमचा मित्र, साकेत, ह्याने ह्या विषयावर लिहिण्याचा विडा उचलला. वास्तविक, सध्याच्या काळात जोरकसपणे वेगवेगळे मुद्दे मांडणाऱ्या व्यक्ती आणि त्यांचे काही विचार हे मोनोलॉग स्वरूपात मांडावेत अशी माझी इच्छा होती. पण साकेत ने, वेळ घेऊन, ही लोकं एकमेकात गुंफली आणि त्याचेच एक नाटक केलं.

एकाचवेळी सगळीकडून ऐकू येणारे निरनिराळे आवाज: हे खरेतर नाटकाचे बीज.

आणि कथा म्हणाल तर एका गावात घडणारी. गोमास वाहून नेत असल्याच्या संशया वरून एका व्यक्तीची गावात हत्या होते आणि हळूहळू त्याला धार्मिक रंग कसा चढत जातो हे कथासूत्र.

त्यातील पात्ररचना साधारण अशी, गावचा सरपंच, त्याच्यासाठी काम करणारी त्याची टोळी, गावातील एक गांधीवादी विचारवंत. एक जण गोहत्या धर्माशी जोडणारा, एक जण अर्थव्यवस्थेशी आणि जातीवादाशी. अश्या अनेकविध छटा असलेल्या पात्रांनी त्या नाटकाला साज चढवलेला!

अश्या नाटकाला सादर कसं करावे? कुठलाही प्रोपोगांडा न वाटता तो एक कलाप्रकार म्ह्णून कसा पाहिला जाईल?, ह्या विचारात असताना एक भन्नाट कल्पना सुचली. नाट्यवाचन वुईथ साऊंड इफेकट्स!

लोकांना एका खोलीत वेगवेगळ्या जागी बसवायचे. मध्ये प्रेक्षक बसतील आणि प्रेक्षकांना चारही बाजूनी नाटकामधील आवाज ऐकू येतील.

अनेक बाजूंनी आदळणारे आवाज! आणि त्यात ऐकू येणारे संवाद… (विविध मतप्रवाह ह्या अर्थी)

ह्या कल्पनेचे श्रेय जाते आमच्या अजून एक मित्राला, पोलंड स्थित, मंदार पुरंदरे ह्याला! त्याने काही वर्षांपूर्वी, पुण्यात ललित कला केंद्राच्या मुलांना घेऊन ह्याच प्रकारचे एक नाटक सादर केलं होते! त्यावरूनच मला हे खरेतर सुचले! २०१८ सालीच त्याने भारतात येऊन असेच एक नाटक पुन्हा बसवले, हा अजून एक योगायोग! त्या नाटकाचे नाव, अल्ला हाट हुंडर्ट नामेन (अल्लाची १०० नावे)

नाटकाच्या तालमी चालू असताना, रस्त्यावरून येणारे आवाज, पानांची सळसळ, दुरून ऐकू येणारे आवाज अश्या अनेक आवाजांची आम्ही तयारी केली आणि मग ते यथावकाश मध्ये मध्ये प्लेस केले. खून पडल्यावर चारही बाजूंनी उडणारा गोंधळ असो किंवा शेवटी प्रेक्षकांना थेट प्रश्न विचारणारी कविता असो! सर्व बाजूंनी आपल्या अंगावर काहीतरी आदळत आहे असा आभास आम्ही निर्माण केला.

लोक हे नाटक पाहणार होते , जरी रूढार्थाने ते ऐकण्यासाठी बसवले गेले असले तरीही! जागेच्या एकंदरीत डिझाईन मुळे अंधार करता येणे अवघड गेले असते, कारण ती काही थिएटर स्पेस नव्हती. एका घराचा तो दिवाणखाना होता. त्यामुळे बराच खल केल्यावर, आपण डोक्याला शिंगे लावून वाचू अशी कल्पना आली. ती शिंगे चमकली तर? अशी शिंगे आपल्याकडे प्रत्येक चौकात मिळतात. पूर्वी ओनिडा चा जसा तो भुत्या दिसायचा तशी शिंगे! आणि तशी ती शिंगे आम्ही विकत घेतली आणि अर्थात वापरली!

अदिती नावाच्या एका मुलीने आपल्या चित्रांनी सीन्स मधे रंग भरले. आपण समोर चितारलेले चित्र जणू आवाजातून पहात आहोत अशी आम्ही त्याची रचना केली. अदितीने अत्यंत खुबीने सर्व चित्रं काढली. सिन सुरू व्हायच्या आधी एक चित्र समोर यायचं आणि मग लोक त्यांच्या कुवतीप्रमाणे, ऐकू येणाऱ्या आवाजातून त्या सीन ला समजून घेतील, अशी साधारण भूमिका होती.

आपल्या देशात , कायमच अनेक आवाज अनेक वर्षे येत असतात आणि त्यालाच आम्ही आमची प्लुरलिस्टीक सोसायटी संबोधतो हा संदेश ह्या नाटकाद्वारे तर गेलाच पण असे आवाज कधी कधी घातक पण ठरू शकतात , त्यामुळे आपण सर्वांनी ह्याचा समग्र विचार करणे गरजेचे आहे हा एक हिडन मेसेज सुद्धा (सुप्त संदेश) अलगदपणे पोहोचवला गेला. अनेकविध संस्कृतींनी फुललेला देश असणे म्हणजे नक्की काय असणे हे ह्या निमित्ताने मुलांनी एक्स्प्लोर केलं असं म्हणावे लागेल.

नाटकाच्या शेवटी, सरपंचाचे चेलेच एकमेकांवर तुटून पडतात आणि त्या भांडणात शेवटी एकमेकांचे जीव घेतात. मुडदे पडत असताना एकमेकांना जात आणि धर्मावरून शिव्या देत एकमेकांचा मुडदा पडणारी मंडळी हळूहळू प्रेक्षकांच्या जवळ (आवाजातील चढउताराद्वारे) जातात आणि हे नाटक संपते.

इथे एक छोटासा प्रश्न आपल्याला पडू शकतोच… आपल्या भवतालच्या अवकाशाची “आपल्या समजुतीने” मांडणी हा एक भाग… त्याचा परदेशात किंवा जागतिक स्तरावरील संबंध हा जोडता येऊ शकतो का? किंवा… आला का? अश्या पद्धतीच्या कलेमध्ये भावनाप्रधान मांडणी असते असे अनेकदा होते. मग, सध्याच्या परिस्थिती वरील भाष्य म्हणून होणारी कला ही सीमित राहते का? कानावर येणाऱ्या बातम्यांपेक्षा वेगळी कशी होते?

नेमके ह्याचमुळे, जर्मन लोक ह्या प्रकाराला कसे सामोरे जातील ह्याची उत्सुकता होती. जर्मनी मध्ये इमिग्रंट येत आहेत, मोठ्या प्रमाणात रहात आहेत हे आपण जाणतोच. त्यांचे भावविश्व समजून घेताना, चालीरीती समजून घेताना, खूप वेळा एकांगी टीका केली जाते. अर्थात, विचार करणाऱ्या माणसाला ह्याचा त्रास होतोच. एकीकडून, इमिग्रंट नकोत, बेरोजगारी वाढेल असा सूर, दुसरीकडून इमिग्रंट आले नाहीत तर आपला देश कसा चालवला जाईल असा विचार, तिसरीकडून आपण कायमच प्लुरलिस्टिक सोसायटी होतो त्यामुळे इमिग्रंट आले तर त्रास का व्हावा अशीही एक अर्ग्युमेण्ट. ह्यात अजून इमिग्रंट वर होणारे हल्ले हा एक नाजूक विषय!

ह्या पार्श्वभूमीवर, चहुबाजूनी जिथे बातम्या आदळत असतात अश्या जगात, आपली सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवणे आणि ह्या प्रकारांकडे पाहणे आणि आपली एक भूमिका मांडणे हेच महत्वाचे ठरते. आमची भूमिका आम्ही नाटकामधून मांडली आणि प्रेक्षकांनी, त्यांची भूमिका बदलणार आहे, हे नाटकानंतरच्या काही क्षणातील स्तब्धतेने, अधोरेखित केलं आणि नंतर काही वेळात ज्या प्रकारची वैचारिक देवाणघेवाण झाली, त्यावरून आमचा प्रयोग काही अंशी का होईना, सफल झाला ह्याचे समाधान आजही आहेच!!!!

एका प्रेक्षकाने दिलेल्या कमेंट ने शेवट करतो. ती कायम स्मरणात राहील,

तो म्हणाला होता:

“तुमची शिंगे चमकत होती आणि त्यामुळे ते सिग्नल सारखे वाटत होते… म्हणजे तुम्हाला सिग्नल मिळत आहेत आणि तुम्ही काहीतरी प्रोजेक्ट करत आहात ….”

खूप काही सांगून जाते नाही हि कमेंट?

२०१९ मध्ये सादर केलेल्या जर्मन नाटकाविषयी लवकरच

- धनेश जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

डुईसबुर्ग जर्मन लॅंग्वेज कोर्स

काही दिवसांपूर्वी मी एक पोस्ट टाकली होती. त्यात मी उल्लेख केला होता तो आमच्या डुईसबुर्ग जर्मन लँग्वेज कोर्स साठी आम्ही गेली ३ वर्षे जर्मन नाटक

Read More »

डुइसबुर्ग जर्मन लँग्वेज कोर्स, सप्टेंबर २०१८

२०१७ साली, आम्ही पहिल्यांदा कोर्स मधील मुलांना घेऊन जर्मन नाटक बसवले. कोर्स मधल्याच मुलांनी लिहिलेलं. आणि तो प्रयोग खूपच वाखाणला गेला. त्या प्रयोगाविषयी मी लिहिले

Read More »