बरेच दिवस लीनियं आईन्स ह्या जर्मन नाटकाविषयी लिहायचं घोळत होते. हे बर्लिन मधील “ग्रीप्स थिएटर” चे नाटक आहे. हि एक मोठी चळवळ आहे. तरुणांसाठीची नाटके करण्यासाठी चालवली जाणार नाटक कंपनी (रेपर्टरी). लिनियं आईन्स म्हणजे लाइन वन. बर्लिनमधल्या अंडरग्राऊड लोकल ट्रेनच्या जाळ्यातील एक लाईन. जर्मनी मधे जवळजवळ प्रत्येक शहरात लोकल ट्रेनचे जाळे असते. बर्लिनमधे ह्या जाळ्याला विशेष महत्त्व आहे. एकतर ती जर्मनीची राजधानी. ऐतिहासिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या युरोपियन शहरांपैकी एक. नानाविध संस्कृतींचे वीण पोटात सामावलेले शहर, बर्लिन.
ह्या नाटकाचे प्रयोग गेली जवळजवळ ३० वर्ष चालु आहेत. आजही प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल असतो. ह्या नाटकाचे ५ प्रयोग पाहायचे भाग्य मला लाभले. दोन पुण्यात आणि तीन बर्लिन मधे.
तेही विविध कालखंडात, विविध अनुभवांच्या पार्श्वभुमीवर. पुण्यात २००१–२ च्या आसपास ह्या नाटकाचे २ प्रयोग लागले होते. साधारण १८–१९ वर्षांचा असेन. नवीन काही पाहिलं की भारावुन जाण्याचच वय ते! सबटायटल असलेलं नाटक! भव्य, दिव्य सेट! लोकल ट्रेन मधला प्रवास रंगमंचावर जिवंत होत असलेला! लाइव्ह म्युझिक! सुंदर गोऱ्या मुली! जमुन आलेला माहोल! विशेष!!!
नाटकाच्या गोष्टीत रस नसलेलं आणि इतर रसभंग होऊन न चालणारे वय!
नाटकाची कथा साधारणतः अशी(त्या काळात उमगलेली)
एक मुलगी तिच्या प्रियकराला शोधायला बर्लिन मधे आलीये आणि अंडरग्राऊड ट्रेन मधला तिचा प्रवास आणि सरतेशेवटी तिला मिळणारे तिचे प्रेम! बास! खतरनाक! आपले प्रेम ह्या खडतर प्रवासात सरतेशेवटी आपल्याला मिळणारच हा विश्वास तरुण लोकांना मिळाला की जग जिंकल्यासारखेच वाटते.
नंतर २००६ साली बर्लिन मधे नाटकाच्या दौऱ्यावर गेलो असताना पुन्हा हे नाटक पहायचा योग आला. पुण्यात ग्रीप्स ची मराठी नाटकं पाहिलेली, मोठ्या माणसांनी लहान मुलांचे रोल करायचे आणि दिलं खुश करून सोडायचा असं काहीसं त्याचे स्वरूप. कोथरुड, कर्वे रोड, कर्वेनगर, पाषाण, इथल्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या नवश्रीमंत मराठी मुलांसमवेत नाटक पाहणं हाही एक मोठा भाग्याचाच क्षण! आपल्या आजुबाजूला जे प्रकर्षानं दिसत नाही ते नाटकात दिसते म्हणुन खुश झालेला मी पानमळा रहिवासी! आणि नंतर थेट बर्लिन मधे एम. ए. जर्मन शिकणारा विद्यार्थी म्हणुन आणि एक नट म्हणुन ग्रिप्सच्या पंढरीत लीनियं आईंस पाहणारा मी.
पहिला धक्का – किती छोट्या जागेत ही लोकं हे नाटक करतात. प्रेक्षक किती जवळ आहेत. चारही बाजूंनी! अभिनिवेश नाही. अंतर नाही. अवाढव्य सेट्स नाहीत. थेट!
नाटकाची गोष्ट: वर जशी उमगली होती तशीच. फक्त आता त्यात इतरही खुप अतरंगी लोक आहेत. त्या साऱ्यांचा मिळुन प्रवास आहे. प्रवासात आपली हिरोइन एकटीच केंद्रस्थानी नाहीये. आणि लहान मुलाचे रोल मोठी माणसे करतात ते ग्रिप्स असं काही नाहीचे… सगळ्या नाटकात हा फॉर्मुला नाहीच दिसतेय…
नंतर थेट २०१६:
जर्मनी मधे एक शैक्षणिक सहल घेऊन गेलो होतो. आग्रहाने हे नाटक पाहायचेय असं ठरवले होते. निम्म्या पुणेकरांनी नाकं मुरडली. नाटक पहायची सक्ती कशी करणार? उर्वरित लोक तयार झाले.
कर्मधर्मसंयोगाने तिकिटे मिळाली आणि पुन्हा एकदा मी लीनियं आईंस् पाहिले. नाटक संपल्यावर पोरे जाम खूष! आणि ते खुश तर मीसुध्दा खुश!
आता २०१७:
पुन्हा एकदा जर्मनी मधे शैक्षणिक सहल आणि पुन्हा एकदा लीनियं अाइंस! ह्यावेळी जरा नाजुक पार्श्वभुमी! एका मुलाचे पाकीट चोरी झालेलं तर एका मुलीचा मोबाईल हरवलेला. पाकीट चोरीच्या निमित्तानं सार्वजनिक वाहतूक आणि सुरक्षा हा विषय
सगळ्यांच्याच रडारवर. पोलिसांची हतबलता आणि त्यामुळे पश्चिमात्य प्रगत देशांमध्ये फिरताना आलेली निराशा! अवघड काळात कुठलीही कलाकृती तुम्हाला सत्यपरिस्थितीच्या जवळ घेऊन जात असेल तर ती कालातीत असते!
ह्यावेळी नाटकाची गोष्ट उमगली ती अशी:
१९८७ साली एक मुलगी पश्चिम जर्मनीत तिच्या प्रियकराला भेटायला आली आहे. पश्चिम जर्मनी म्हणजे पूर्वी अमेरिका आणि फ्रान्स , इंग्लंड ह्या मित्रदेशांच्या ताब्यात असलेला जर्मनीचा भूभाग!
स्वातंत्र्य , सुबत्ता, सुशासन ह्या त्रयींचे नेतृत्व करणारा! पूर्व जर्मनी च्या अगदी विरुध्द!
पण मुलगी बर्लिन (पश्चिम) मधे आल्यावर तिला सर्वप्रथम काय दिसते?
गरीबी, बेरोजगारी, दारुडे, भिकारी, ठग, नैराश्येने ग्रासलेले आणि प्रेम हरवलेले तरुण!
आणि ह्या सगळ्यात प्रतिष्ठित आणि मानाचे स्थान असलेले श्रीमंत हिटलरवादी! गरिबीला आणि बेरोजगारीला शिव्या देणारे मध्यमवर्गीय! प्रेमभंग झालेले आणि प्रेमात आकंठ बुडालेले! समलिंगी लोकांकडे तुच्छतेने पाहणारे!
एकीकडे समाजातील गोर गरीब, तळागाळातले, प्रस्थापित सामाजिक चौकटीत न मोडणारे आणि एकीकडे प्रस्थापित आणि नैराश्यवादी!
ह्या सगळ्यांमध्ये आपला प्रियकर शोधण्यासाठी धडपडत असलेली एक तरुणी! तिचा प्रियकर एक मोठा पॉप स्टार आहे आणि तो तिला सापडवायचा आहे. अनेक लोकांशी ती बोलतेय, अनेकांना प्रसंगी धीर देतीय.
साधारणतः पूर्वोत्तर देशांमध्ये पाश्चिमात्त्य देशांची एक प्रतिमा तयार झालेली असते. त्या देशांमध्ये सर्वजण श्रीमंत असतात. सर्व गोरे असतात. सर्व सुखात असतात. सर्वांना शिस्त असते. रस्ते मोठे असतात. जवळजवळ त्यांच्यावर संकटे येतच नाहीत. वगैरे वगैरे… आणि संकटे आलीच तर आपल्या प्रगत बलाच्या जोरावर ते कुठलीही समस्या हमखास परतवुन लावतात, तिचा समूळ नायनाट करतात.
ह्या नाटकामध्ये पश्चिम बर्लिन घेतले आहे. मित्र देशांकडे असणारा भाग. म्हणजे सुबत्ता, स्वातंत्र्य. आणि नेमके इथेच नाट्य आहे. जगाला दाखवण्यासाठी एक चित्र आणि प्रत्यक्षात मात्र नाटकामध्ये दिसते ते गरिबी, बेरोजगारी आणि समाजाकडून अव्हेरले गेलेले घटक. रूढार्थाने हे राजकीय नाटक नव्हे. पण सामाजिक आशय असलेले आणि व्यक्तिकेंद्रित गोष्ट असलेले एक राजकीय भाष्य करू पाहणारे नाटक नक्कीच आहे. व्यक्तिकेंद्रित अश्यासाठी कि प्रेम, सहवास,इत्यादी व्यक्तिगत पातळीवर राहणारी भावनांची गुंफण आणि अश्या भावना बरोबर घेऊन चाललेली एक स्री आणि दुसऱ्या पातळीवर हे सगळे अव्हेरले गेलेले लोक. नैराश्येने ग्रासलेल्या आणि ड्रग्स च्या आहारी गेलेल्या एका मुलीची आत्महत्या, काहींचे समलैंगिक संबंध आणि अश्या काही प्रसंगावर तुटून पडणारा नोकर वर्ग आणि म्हातारे. एकमेकांवर संशय घेणारे युगुल आणि खूप वर्षांपूर्वी ताटातूट झालेले एक जोडपे…. तेही इथेच. हे सगळे बेमालूमपणे एकात एक असं मिसळलेले! खुमासदार आणि विनोदी अंगाने जाणारे नाट्य!
बर्लिनविषयी एक अत्यंत रोमँटिक चित्र गळून पडते ते इथेच!
ह्या मुलीचा एकजण सतत पाठलाग करतोय, तिच्या प्रत्येक प्रवासात तो तिला नजरेआड होऊ देत नाहीये. पूर्व जर्मनी मध्ये लोकांवर सतत लक्ष ठेवणे आणि त्यांना कुठेतरी सतत अडकवायला बघणे हे नित्याचेच , पण पश्चिम जर्मनीमध्ये?
बेरोजगारी आणि नैराश्य पश्चिमेत?
नक्की आनंदी कोण? जॉबलेस का जॉब असलेले?
वेडे नक्की कोण? भटकभवाने का झ्याकपॉक चाकचुके?
डोके सटकलेले कोण? प्रेमात आकंठ बुडालेले कि हिटलरच्या बाहुपाशात अजूनही रमू बघणारे?
नाटकाच्या शेवटी त्या मुलीला आपला प्रियकर भेटतो पण तोपर्यंत ती पुरती बदलुन गेली आहे. त्याचे ते उगाचच पॉप स्टार सारखे, ते उगाचच मिरवणे तिला खटकतेय आणि ती त्याच्याबरोबर राहण्याचा निर्णय रद्द करते आणि सरतेशेवटी एका होतकरू कवीबरोबर निघून जाते.
जर्मनी मध्ये कविता वाचणारे आणि लिहिणारे तसे कमीच. पण चित्तचक्षुचमत्कारिक प्रियकरापेक्षा कवितेमधे रमणारा प्रियकर हे जो मनुष्य निवडतो त्याला खरे प्रेम मिळाले आहे का ? ते खरे आयुष्य आहे का? हा प्रश्न नक्की पडतो.
सर्व कलाकृतींच्या प्रत्येक कालखंडात मर्यादा असतात, तश्या त्या ह्या नाटकाला सुद्धा आहेत. अत्यंत भाबडा आणि प्रेमाळू शेवट आणि मधूनमधून सुरेल गाण्यांची पेरणी! हे काही लोकांना नक्कीच खटकेल; पण तरीही, आजही, नवमध्यमवर्गाला आकर्षित करून घेण्यासाठी, प्रस्थापितांच्या चौकटीबाहेरचे जग दाखवायला लागणे आणि ते चवीचवीने सर्वानी अजूनही बघणे ह्यातच ह्या नाटकाचा एक सुप्त संदेश दडला आहे असं मला वाटते.