जर्मन भाषा वर्ग घेत असताना निरनिराळ्या पातळ्यांवर जाऊन विद्यार्थ्यांशी जुळवुन घ्यावे लागते. विशेषतः ३ री लेव्हल शिकवत असताना. त्याचा पसारा अवाढव्य असाच आहे.
(अर्थात ज्यांना तो पसारा अडगळ म्हणून दूर सारायचा नाहीये, त्यांच्यासाठी!)
त्यातलीच एक पातळी म्हणजे, आपल्याला फारशी माहिती नसलेल्या विषयांबद्दल बोलायला उद्युक्त करणे.
ह्याचे प्रमुख कारण, म्हणजे कुठल्याही विषयावर परीक्षेमध्ये बोलायला विचारले जाऊ शकते. ढोबळ मानाने अंदाज लावता येतो पण कुठलेही अपेक्षित ठोकताळे बांधता येणे कठीण.
उदाहरणार्थ: शिक्षणक्षेत्र हा विषय पाठ्यपुस्तकात असेल तर परीक्षेमध्ये, “राज्यशास्त्र शालेय अभ्यासक्रमात शिकवला जावा का?” ह्या विषयावर मतप्रदर्शन करायला विचारले जाऊ शकते.
ह्या / अश्या विषयावर काय बोलावे? काय लिहावे? हा गहन प्रश्न विद्यार्थ्यांसमोर कायमच असतो. एकुण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा आपल्या आयुष्याशी काही ताळमेळ नाही असा प्रचंड विश्वास ह्या मुलांना असतो.
(अपवाद असतातच. पण जर्मन शिकणाऱ्या मोठ्या वर्गात अभावानेच)
अश्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी काही युक्त्या आहेतच. अर्थात त्यांचा आधार शिकवताना घ्यावा लागतोच. उदाहरणार्थ, काही प्रश्न स्वतःस विचारणे, जसे की, आपल्याला ह्या विषयांबद्दल का माहिती नाही? तर आम्ही आमच्या मित्रमंडळीत हे बोलत नाही किंवा शाळेत असताना असा विचार कधीच केला नाही इत्यादी…
(तुम्हाला नमनाला थोडे तेल मिळाले)
असं उलटे उलटे जाऊन तुम्हाला मुद्दे मिळतात आणि तुमचं एक अर्ग्युमेंट तयार होते.
पण मूळ मुद्द्याला ह्यात बगल दिली जाते. आणि तो मुद्दा म्हणजे, राजकीय आणि सामाजिक विषयांवर काहीच लिहिता अथवा बोलता न येणे हा एक गंभीर मुद्दा नाही का?
(ते ही अश्या विद्यार्थ्यांकडून , जे शालेय जीवनात भरघोस गुण मिळवुन यशस्वी विद्यार्थ्यांच्या मांदीआळीत जाऊन बसले आहेत)
त्याचे मूळ कुठे दडले असावे?
मला माझा शाळेतला इतिहासाचा वर्ग आठवतो.
(ह्यात कोण होत्या त्या बाई: हा मुद्दा गौण आहे, त्या अश्या का होत्या असा प्रश्न विचारणे योग्य आहे, असं माझे मत आहे. म्हणून नाव उद्धघृत करत नाही)
घंटा वाजली की इतिहासाच्या बाई वर्गात यायच्या. एकसाथ नमस्ते वगैरे झाले की त्या सरळ वही उघडायच्या आणि त्यांनी लिहिलेल्या नोट्स वाचुन दाखवायच्या. मुलांची ते टिपून घेण्यासाठी धावपळ उडायची. कारण इतिहासाचे कुठलेही क्लासेस आमच्या पिढीपर्यंत न्हवते. बरोबर ४० मिनिटे हा खेळ चालायचा. ते झाल्यावर दुसऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण कशी बिनचूक उत्तरे लिहू शकतो हा अत्यानंद मुलांच्या चेहऱ्यावर असे.
दुसरा वर्ग: इंग्रजी भाषेचा.
रोज पहिली ३० मिनिटे वर्गातली काही हुशार मुलं , (मराठी माध्यमात इंग्रजी विषय शिकवणारा टीचर म्हणून संबोधला जायचा) टीचर ने सांगितलेला होमवर्क वाचून दाखवायची.
तो फार मजेशीर असायचा. प्रत्येक धडा हा इंडायरेक्ट्ट स्पीच मधे कन्व्हर्ट करून आणायचा आणि वाचुन दाखवायचा. ह्यात व्हायचे असं, की अप्रत्यक्ष विधाने कशी चपखल करावीत ह्या तंत्रावर हुकूमत मिळवण्यात मुलांची बुद्धी खर्च पडायची. प्रत्यक्ष एखाद्या धड्याला सामोरे कसे जावे हे आम्ही कधी शिकलोच नाही. त्या धड्यात लिहिल्या गेलेल्या शब्दांचा आमच्या आयुष्याशी काय ताळमेळ आहे हे कधी विचारातच घेतले गेले नाही.
(ह्यातच तो धडा उरकला जायचा, हेच ते शिकवणे!)
सर्व शाळांमध्ये ही परिस्थिती नसली तरी बहुसंख्य शाळेत ह्या विषयांकडे बघण्याचा दृष्टीकोन असाच होता. किंबहुना तंत्रज्ञानाचा वापर होत असलेल्या सध्याच्या शाळांमध्येही दुसऱ्याने विचारलेल्या प्रश्नांना त्यांना पटतील अशी चपखल उत्तरे कशी लिहावीत ह्या मुद्द्यावर जास्त भर असतो. तिकडे कळले नाही तर क्लासेस आहेतच. थोडक्यात मी मशीन ओढून नेऊ शकतो किंवा हुबेहुब तयार करू शकतो पण नवीन काही बनवण्याची क्षमता माझ्यात नाही कारण माझ्या सामाजिक आणि राजकीय परिप्रेक्ष्यात बसणारे किंबहुना त्याला सामावून घेणारे मशीन बनवायची गरजच आज उरलेली नाहीये.
दुसऱ्याचे प्रश्न, त्याला अभिप्रेत असलेले उत्तर आणि ते आत्मसात करत असलेले असंख्य विद्यार्थी!
ह्यात विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या विषयांची काय गत होणार?