जर्मन नागरिक हा वरवर मख्ख चेहऱ्याने वावरत असला तरी त्याच्यामधे शांतपणे ऐकुन घेण्याची आणि दुसऱ्या व्यक्तीशी शांतपणे संवाद करण्याची एक प्रवृत्ती आहे, (ती कधीपासून आहे आणि त्याची कारणे काय आहेत ह्याविषयी पक्के मला सांगता येणार नाही) ते भारतीयांसारखे रूढार्थाने आवाजी किंवा लाऊड नसतात पण म्हणुन ते आनंदी नसतात असं नाही. ते रेल्वेत, बसमध्ये, सार्वजनिक ठिकाणी फार मोठ्यांनी बोलणार नाहीत अथवा काही वेळाच मोठ्यानं बोलतील, पण ह्याचा अर्थ ते आयुष्याची मजा घेत नाहीत असा होत नाही. कुठल्याही गोष्टीवर समजुन उमजुन बोलायची त्यांची वृत्ती नक्कीच वाखाण्यासारखी आहे.
खुप लोक मोठ्यांदि बोलतात, जोरजोरात भांडतात, रस्त्यावर उतरून नाचतात म्हणजे ते कायम आनंदी आणि सुखी असतात असं न्हवे. कदाचित शांततेमधला श्वास त्यांना सापडलेला नसतो, असं म्हणता येईल. काहीतरी पटकन करण्याची प्रवृत्ती सोडणं, मोठ्या ध्येयाचा घास घेण्याआधी , एक हजार छोट्या गोष्टी तडीस नेणं, प्रत्येक पायरीवर स्वतःला प्रश्न विचारणे म्हणजे खऱ्या अर्थानं जर्मन भाषा आणि संस्कृती अंगिकारणे होय.
परप्रांतामधुन, दुसऱ्या देशांमधुन आलेल्या लोकांनी सुद्धा जर्मनी मध्ये हे गुण अंगिकारले तर त्यांना जर्मनांकडुन अव्हेरल्यासारखं वाटण्याची शक्यता कमी आहे. अर्थात म्हणुन अशी लोकं आम्हाला नकोत किंवा त्यांना एका भागापुरते मर्यादित ठेऊन आणि शिक्षण देऊन, त्यांना आपल्या संस्कृतीचा भाग बनवता येईल हा भाबडा विश्वास सुद्द्धा मारकच आहे.
म्हणजे महारांसाठी स्वतंत्र मंदिर बांधले कि ते समस्त हिंदु धर्माचा भाग होतील आणि हिंदु एक होईल असं काहीसं म्हणण्यासारखे आहे.
हे आदानप्रदान प्रचंड अवघड आहे आणि प्रत्येक क्षणाला ह्यासाठी आणि ह्यामध्ये राजकारण आहे, जागतिक दडपण आहे, विविध मतप्रवाह आहेत, पण त्यांना शांतपणे भिडल्यावाचून आत्तातरी दुसरा कुठलाच मार्ग जर्मनी समोर दिसत नाहीये.
आमचं आणि तुमचं करत बसण्यापेक्षा “आपलं एकत्र काहीतरी”, असा विश्वास संपादन करायला काही वर्षे जावी लागतील आणि जर्मनी त्यात नक्कीच यशस्वी होईल हा विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही.
शास्त्रीय दृष्टिकोन, खोलवर, मुळाशी जायची प्रवृत्ती आणि नाविन्याचा ध्यासच माणसाला विनाशापासुन वाचवतो आणि बाकी जगाशी जोडतो आणि जे समोर दिसतं आहे , जाणवतं आहे त्याचा गर्भितार्थ काढायला मदत करतो हा इतिहास आहे आणि हा इतिहास कुठलाही धर्म अथवा पंथ मिटवु शकत नाही.