गेली ७ वर्षे जर्मन भाषेचे धडे देताना जशी नवी नवी माणसं ,विद्यार्थी भेटत गेले तसतसं ह्या व्यवसायामधली अडचण आणि समस्या कळत गेल्या. त्यातल्याच एका मोठ्या आणि वरवर छोट्या पण अत्यंत महत्वाच्या समस्येवर बरेच दिवस काहीतरी लिहावं असं वाटत होतं. पण वाटणं आणि समर्पक शब्दात ते मांडता येणं हि तारेवरची कसरत कशी जमेल असं सारखं वाटायचं. शेवटी आज हे धाडस करतोय. मला उत्तरं सापडली नाहीयेत त्यामुळे बरेच प्रश्न घोंघावताहेत तेच मांडतो आहे.
परकीय भाषा शिक्षण:
१९९० सालानंतर भारतात एक प्रचंड मोठी लाट आली, नव्या शाळा, खासगी रुग्णालये, खासगी विमा योजना, छोटे व्यावसायिक निर्माण होण्यासाठी पोषक सरकारी धोरणे इत्यादी. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे जगाकडे पाहायची , त्याला समजून घेण्यासाठी झटपट तयार होत असलेली साधने!
नवीन तंत्रज्ञान, दरघडीस बदलणारे! पेजर ते मोबाईल हा टप्पा १० वर्षांच्या आत गाठणारे जग अधिकच एकमेकांच्या जवळ येऊ लागले! रोजगाराच्या संधी आणि नाविन्याचा ध्यास ह्यामुळे साहजिकच नवीन काहीतरी सातत्याने शिकण्याचा कल वाढू लागला. मग ते उन्हाळी सुट्टीमधले संस्कार वर्ग असोत किंवा संगणकाची तोंडओळख असो! प्रत्येक कल्पना हि एकमेकांशी स्पर्धा करू लागली, जे टिकेल असं वाटत होतं ते संपून गेलं आणि ज्याला बाजारभाव खचितच होता ते भाव खाऊ लागले! नवीन तंत्रज्ञानामुळे कदाचित भारतामधल्या अशास्त्रीय गोष्टी काळाच्या पडद्याआड जातील असं वाटले होतं त्या तर आणखीनच , नवीन स्वरूपात यायला लागल्या. उदाहरणार्थ, कुंडल्या, वास्तुशात्र, इत्यादी.त्यांना स्वतःचे असं एक स्थान निर्माण करण्याची जागाच जणु उपलब्ध झाली. ह्या अश्या कल्लोळात परकीय भाषा शिकायचा छंद जोम धरू लागला, कारण संगणकीय तंत्रज्ञान वापरून ह्या गोष्टी लवकर आत्मसात करता येतील असा विश्वास तयार होऊ लागला होता.
अनेक परकीय भाषेचे धडे देणाऱ्या संस्था त्या पुढच्या काळात तयार झाल्या. भारतीय तसेही नवीन गोष्टीसाठी आसुसलेले होतेच, त्यामुळे प्रत्येक परकीय भाषेकडे त्यांना ओढण्यासाठी नवीन क्लुप्त्या लढवल्या जाऊ लागल्या. विद्यार्थ्यांना परदेशात मोफत शिक्षण,छोटे छोटे दौरे,कॉन्फरन्स इत्यादी! परिणामी विद्यार्थी वाढले आणि परकीय भाषेकडे विद्यार्थ्यांचा कल जोमाने वाढला.
वाढ झाली, उत्सुकता वाढली:
कुठल्याही क्षेत्रात वाढ होणं म्हणजे नवीन भांडवल तयार होणं, विनिमय वाढणं. पण उंच उंच इमारती असणं आणि एक घर असणं ह्यात जो फरक आहे हा कोणी समजाऊन घेतला का?
मला घर घ्यायला पैसे लागतात पण घरपण यायला काय लागतं ह्याचा विचार आपण करतो का?
मी कोण?
परकीय भाषा शिकताना स्वतःकडे बघायचा एक चष्मा आपण तयार करत असतो. तो चष्मा तयार करण्याची गरज आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मात्र आपण एकाच चष्म्यातुन सर्वत्र बघत असतो. मुळात एक भारतीय माणूस जेव्हा एक अ-भारतीय भाषा शिकतो तेव्हा तो भारतीय समाजमन मोठं किंवा व्यापक करत असतो का?- ह्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज असते हे कुठलाच शिक्षक विचारात घेत नाही. मी,मला येणारी नवीन भाषा वापरून, माझ्या आजुबाजुला घडणाऱ्या घटना अधिक व्यापक स्वरूपात एका वेगळ्या संस्कृतीसमोर मांडु शकतो आणि त्याद्वारे एक अव्यक्त दालन व्यक्त स्वरूपात खुलं करू शकतो ही शक्यता आपण का बरं नाकारायची?
आणि त्यानिमित्तानं त्या घटनांकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहायची मुभा आपण स्वतः स्वतःला देत असतो ते महत्वाचं नाही का?
माझा शब्दसंग्रह वाढीस लागून मला बाजारात उत्तम दुभाष्या किंवा भाषांतरकार म्हणून कसं वरचं स्थान मिळेल आणि माझी संपत्ती कशी वाढेल एवढी एकच माफक अपेक्षा आपण परकीय भाषा शिकताना ठेवावी का? असा खरं तर प्रश्न आहे.
भाषा शिकवण्याचा दृष्टिकोन:
एखादी परकीय भाषा शिकणे आणि ती शिकवणे हा व्यवहार कुठल्याही इतर व्यवहारांपेक्षा अधिक जबाबदारीचा आणि तितकाच जोखमीचा आहे. मी एखाद्याला दुसऱ्या भाषेमधले अ,ब,क,ड शिकवतो म्हणजे काय? मी फक्त शब्द शिकवतो? अक्षरंच शिकवतो? का फक्त त्या भाषा जिथे बोलल्या जातात ती संस्कृती अंगिकारायला शिकवतो? मुळामधे भारतीय शिक्षक जेव्हा भारतामधे,भारतीय मुलांना परकीय भाषा शिकवत असतो तेव्हा तो भारतीय नागरिक घडवत असतो हा विचार करतो का? भारतीय समाजात घडत असलेल्या गोष्टी, आजूबाजूला घडणाऱ्या घटना ह्या त्या भाषेमध्ये व्यक्त करायला सांगतो का? का फक्त बघा तो अमुकतमुक देश कसा महान आहे इतकेच बिंबवतो?
मर्यादित व्यवहार:
तुम्ही तुमच्या देशांमधल्या गोष्टी आम्हाला आमच्या भाषेत सांगू नका, आमच्या गोष्टी तुमच्या भाषेत सांगणार असाल तर आम्ही पूर्ण सहकार्य करू अन्यथा तुमची संस्कृती समजावून घेणे हा आमचा उद्देश नाहीच!—– असं तुम्हाला कोणी म्हणाले तर ?
अश्या प्रकारचा देवाणघेवाणीचा व्यवहार परकीय भाषा शिक्षणात सर्रास चालतो! सर्वच ठिकाणी, सर्व वेळी, असं घडत असेल असं नाही पण एखाद्या देशाच्या पॉलिसी मध्ये अश्या प्रकारच्या व्यवहाराला स्थान असेल, किंवा तसा अर्थ अभिप्रेत असेल तर ते नक्कीच घातक आहे!
सांस्कृतिक देवाणघेवाण:
साधारणतः आपली संस्कृती इतर देशांमधल्या लोकांना कळावी म्हणून गणेशोत्सव किंवा होळी परकीय मुलखात साजरी करणे, किंवा भारतीय लग्नात परदेशी पाहुण्यांना आमंत्रित करणे इतकेच सांस्कृतिक देवाणघेवाणीचे स्वरूप आपण आजूबाजूला पाहत असतो. पुण्यातला मैलापाण्याचा प्रश्न, कचरा व्यवस्थापन, रस्त्यावरचे अपघात, राजकीय उलाढाली असं काही परदेशी पाहुण्यांना, त्यांच्या भाषेत(इंग्रजी सोडून) पुस्तक स्वरूपात किंवा सिने-चित्र रूपात, पुस्तक रूपात किती प्रमाणात उपलब्ध आहे? बोटांवर मोजण्याइतकंच!
का नाही खानोलकर, ग्रेस ह्यांना नोबेल? का आपले साहित्य अजूनही मागासलेलं वाटतय? झालेत का हे लेखक भाषांतरित? जगातल्या सर्व प्रमुख परकीय भाषेत?
झटपट झटपट!:
मला ४ महिन्यात जर्मन च्या ४ लेवल करायच्या आहेत, देणार का करून?
असं विचारणारे आणि असे त्यांना करून देतो म्हणून फसवणारे ह्यांच्यापासून ह्या क्षेत्राला सर्वात मोठा धोका आहे!
४ महिन्यात ७वी ते १०वी चे विषय शिकवून १०वी ची परीक्षा देता येऊ शकते अश्या आशयाचा भलेबहाद्दर विश्वास कितीतरी लोकांमध्ये पाहायला मिळतो!
शिकायला उद्युक्त करणारे वातावरण आहे पण आक्रमक आणि आक्रस्ताळ्या जाहिरातबाजी मधून शिक्षणाच्या नावाने जो बाजार भरवला जात आहे त्यात कुठला व्यापारी सचोटीने व्यवहार करणार आणि आपल्या आजूबाजुच्या परिस्थितीनुरुप लोकांना मार्ग दाखवणार ह्यावर ह्या व्यापाराचे भविष्य अवलंबुन आहे हे निश्चित!
test
adadad