ह्या वर्षीच्या जर्मनी दौऱ्यात आलेले काही अनुभव.

१ एका इन्स्टिट्यूट मधे घडलेला एक किस्सा:

इस्लाम ला मानणारी आणि दिवसातून ५ वेळा नमाज करणारी एक स्त्री. मूळची दुसऱ्या देशामधील. ती, त्या इन्स्टिट्यूट मधे,साफसफाई चे काम करते. तिची एक मागणी होती की इथे प्रार्थना कक्ष नाही त्यामुळे नमाज पठणात अडचणी येतात तर त्याची तजवीज करण्यात यावी. ती फेटाळली गेली कारण कुठल्याही धार्मिक विधींसाठी ही जागा नाही हे कारण देण्यात येऊन. पण प्रार्थना करण्याचा हक्क तर नाकारण्यात येऊ शकत नाही, त्यामुळे एका रिकाम्या खोली मधे तिला नमाज पठणासाठी परवानगी देण्यात आली. इथवर सर्व काही ठीक होते. तिकडे दुरुस्ती आणि देखभालीसाठी येणाऱ्या एका माणसाने आक्षेप घेतला आणि घाबरून त्या बाईंची प्रार्थना काही लोकांकडुन थांबवण्यात आली. अर्थातच त्या बाई नाराज झाल्या आणि इन्स्टिट्यूट च्या हेड ला भेटून वृत्तान्त कथन केला. त्या हेड ने तिची बाजु उचलुन धरून तिला नाकारण्यात आलेली परवानगी फेटाळली आणि कोणा इतर धर्मियांना सुद्धा त्या खोलीत प्रार्थना करता येईल अशीही नोटीस काढली. त्यानंतर परत सर्व सुरळीत!

ह्यात तीन मुद्दे: आपला संबंध नसताना इतर गोष्टीत नाक

खुपसायची खोड माणसात जन्मजात असावी अशी शंका येते.

दुसरे, अत्यंत छोटा प्रश्न, ज्याचे उत्तर अत्यंत साधे असताना, कुठल्यातरी फालतू आक्षेपांमुळे, मोठा बनतो.

तिसरे आणि महत्वाचे: तरीही आपला मूलभूत हक्क वापरून, शांततामय मार्गाने, तो सोडवला जाऊ शकतो.

त्या हेड ने एका छोट्याश्या प्रेशर ला बळी पडून त्याचा निर्णय मागे घेतला असता तर?

२) त्याच इन्स्टिट्यूट मधील आवारात, पायी जात असताना कानावर पडलेला हा संवाद.

एक मुलगा आणि एक मुलगी (कुठल्याश्या इस्लाम बहुल देशामधून आलेले) आणि एक जर्मन शिक्षिका.

शिक्षिका: (गाडीमधून उतरत असताना, त्या दोघांकडे बघून):

अगं, हा तुझा होणारा नवरा का, ज्याबद्दल तु मला सांगितले होतेस?

मुलगी: (जराशी नाराज) : नाही.

शिक्षिका(मुलीचा मूड लक्षात आल्यावर) : ओह, अच्छा, सॉरी, मी थोडीशी चेष्टा करण्याच्या मूड मधे होते, चालते ना अशी चेष्टा.

मुलगी: नाही.

शिक्षिका: हो का, मला माफ कर, आय एम वेरी सॉरी.

मुलगी: (जराशी कंफर्टेबल): नो प्रोब्लेम.

हे झाल्यावर, त्या दोघीही बोलत बोलत, हसत, पुढे जाताहेत.

सर्वात लक्षात राहणारे हे प्रकरण!

मुद्दा:

दुसऱ्याला समजुन घेताना, आपण पटकन चूक करून, त्याबद्दल जाणीव ठेऊन, माफी मागितली तर असे इश्यू ब्लो अप होत नाहीत.

संवाद करण्यात रस असेल तर चुक होऊनसुद्धा, माफी मागुन मन जिंकता येते.

किती छोटी आणि कितीतरी सांगून जाणारी घटना!

३) एका विद्यापीठात चित्रप्रदर्शन असताना घडलेली घटना.

काही चित्रांमध्ये काही मुस्लिम स्त्रिया होत्या. त्यांनी बुरखा घातला नाहीये आणि त्यांचे असं चित्रण इस्लाममध्ये बसत नाही हे कारण पुढे करत, काही मूलतत्ववादी संघटनांनी चित्रं अक्षरशः कापून काढली!

विद्यापीठ प्रशासनाने घाबरून ते प्रदर्शन हटवले.

त्या प्रशासनाने काही एक भूमिका घेतली असती तर?

काही जर्मन नागरिकांच्या मताप्रमाणे:

विद्यापीठ म्हणजे एकत्र येऊन अनेक विषय हाताळण्याची जागा. मतमतांतरे, चर्चा, डिबेट ह्या माध्यमांमधून आपला मुद्दा पोहचवण्यासाठी ही जागा आहे. जर काही लोकांना, काही गोष्टी खटकत असतील तर निषेध करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, खुलेआम चर्चा करण्याचा मार्ग कधीही खुला आहे. त्यानांसुद्धा त्यांच्या विचारांचे समर्थन करणारे प्रदर्शन मांडता आलेच असते की?

त्यामुळे विद्यापीठाने त्यांच्यासमोर मान न तुकवता, ते प्रदर्शन चालू ठेवायचा निदान प्रयत्न करायला हवा होता.

टीप:

ह्या तीनही घटना, धर्म आणि मानवता ह्या गोष्टींशी संबधित आहेत. कट्टरवादी / एक्स्त्रिमिस्ट सर्व धर्मात, पंथात असतात. त्यामुळे कुठल्याही एका धर्माशी याचा सबंध जोडू नये, ही विनंती.

ह्या तीन घटना म्हणजे सबंध जर्मनी नव्हे. त्या प्रातिनिधिक असू शकतील पण त्याच अंतिम आहेत असं मानण्याचे काही कारण नाही.

- धनेश जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

डुईसबुर्ग जर्मन लॅंग्वेज कोर्स

काही दिवसांपूर्वी मी एक पोस्ट टाकली होती. त्यात मी उल्लेख केला होता तो आमच्या डुईसबुर्ग जर्मन लँग्वेज कोर्स साठी आम्ही गेली ३ वर्षे जर्मन नाटक

Read More »

डुइसबुर्ग जर्मन लँग्वेज कोर्स, सप्टेंबर २०१८

२०१७ साली, आम्ही पहिल्यांदा कोर्स मधील मुलांना घेऊन जर्मन नाटक बसवले. कोर्स मधल्याच मुलांनी लिहिलेलं. आणि तो प्रयोग खूपच वाखाणला गेला. त्या प्रयोगाविषयी मी लिहिले

Read More »